कराड प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने जबरी चोरीतील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल, चाकु तसेच रोख रक्कम १ लाख ८१ हजार ४१० रुपये व चोरीस गेलेले २ मोबाईल फोन जप्त केले आहेत.
सुलतान अस्लम मुजावर (वय २५, रा. सोमवार पेठ कराड), मोहम्मद मीर परवेज (वय २४, रा. मुजावर कॉलनी कराड), अमन सलीम सयद (वय २५, रा. सोमवार पेठ कराड) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.०६/०९/२०२४ रोजी एक आयशर ट्रक चिपळूण ते कुंभारगाव ता. पाटण येथे अंडी विकून त्याचे पैसे घेवून जात होता. यावेळी ३ अज्ञात चोरट्यांनी कोयना ते पाटण रोडवरील हॉटेल चायपणी येथे सदरचा टेम्पो अडवला. आणि यातील चालकावर चाकूने हल्ला करुन त्यास जखमी करुन टेम्पोमधील अंडीविक्रीचे मिळालेले रोख १ लाख ८१ हजार ४१० रुपये व २ मोबाईल जबरीने चोरुन नेले. याबाबतचा गुन्हा पाटण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजय पाटील यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस ठाण्यातील तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखेकचे तपास पथकाने घटनेचा अधिक तपास केला. तपास पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे दि. ०६/०९/२०२४ कोयना- पाटण रोडवर हॉटेल चायपानीजवळ ३ अज्ञातांनी एक आयशर टेम्पो अडवला. त्यातील चालकावर चाकून हल्ला करुन त्यातील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला.
या घटनेची अधिक माहिती घेत तपास पथकाने अज्ञात आरोपींचा शोध घेत दि. ०१/१०/२०२४ रोजी कराड परिसरातून सुलतान अस्लम मुजावर, मोहम्मद मीर परवेज, अमन सलीम सयद याला ताब्यात घेतले. यानंतर त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या कबुलीनंतर त्यांचेकडुन गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, चाकु तसेच रोख रक्कम व चोरीस गेलेले २ मोबाईल फोन पथकाने जप्त केली. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि संदिप कामत करत आहेत.
सदरची कामगिरी पाटण पोलीस ठाणे नेमणुकीचे श्री. सपोनि संदिप कामत, सपोनि प्रकाश भुजबळ, सपोनि रोहित फार्णे, पोउनि राजेंद्र सदगर, पोहवा वैभव पुजारी, पोकॉ उमेश मोरे, श्रीकृष्ण कांबळे, केतन नाकाडे, मपोकों वनिता पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा शरद बेबेले, प्रविण फडतरे, अमित माने, गणेश कापरे, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, मोहन पवार, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रविराज वर्णेकर यांच्या पथकाने उत्कृष्ट कामगिरी केली. याबद्दल सर्वांचे पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विजय पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अरुण देवकर, पोलीस निरीक्षक श्री. अविनाश कवठेकर यांनी विशेष अभिनंदन केले.