सातारा प्रतिनिधी | जून महिन्यात काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी कोरडं हवामान पाहायला मिळालं. त्यामुळे शेतीच्या हंगामावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या दिवशी हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाटमाथ्याच्या परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे. या भागासाठी यलो अलर्ट असून उर्वरित भागांमध्ये हलक्या सरींचा अंदाज असून आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतीच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त ठरण्याची शक्यता असली, तरी शेतकऱ्यांनी सावध राहून पीक संरक्षणाची खबरदारी घ्यावी.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि घराबाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. दरम्यान, शेतकऱ्यांनी संभाव्य पावसाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पिकांचं योग्य रितीनं संरक्षण करावं, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.