सातारा प्रतिनिधी | मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाले असून राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत धो धो पावसाचा इशारा दिला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना 3 दिवस अतीमुसळधारेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मान्सूनचे वारे राज्यात शुक्रवारपासून पुन्हा सक्रिय झाले असून गणपतीच्या आगमनालाच धो धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागाला 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना आहेत ऑरेंज अलर्ट (कंसात तारखा)
ऑरेंज अलर्ट : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9). यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9).
पश्चिम महाराष्ट्रात 5 ठिकाणी 6 हजार मिलीमीटरहून अधिक पाऊस
सातारा, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील पाथरपुंज (ता. पाटण) येथे यंदाच्या हंगामात तब्बल ७,३१० मिलीमीटर असा उच्चांकी पाऊस झाला आहे. यंदा पश्चिम महाराष्ट्रात आजवर पाथरपुंजबरोबरच वाळवण, नवजा, दाजीपूर व निवळे अशा पाच ठिकाणी सहा हजार मिलीमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वरलाही यंदा ५९६२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.