सातारा प्रतिनिधी | शेखमिरवाडी (ता. खंडाळा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 3 लाख 33 हजार 250 रुपये किंमतीची अंमली पदार्थ अफूची झाडे जप्त करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे व विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारचे प्रभारी अधीक्षक वैभव वैद्य, यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक, सातारा व फलटण विभागाने दि. 24 रोजी मौजे शेखमिरवाडी गावच्या हद्दीत बेकायदेशीर अफू या अंमली पदार्थाच्या झाडांच्या लागवडीवर छापा टाकून N.D.P.S कायदा 1985 कलम 8 (b), 15 (b), 18(c), 46 नुसार कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत मौ.शेखमीरेवाडी हद्दीतील पुजा-याचा मळा नावाच्या शिवारात गणेश जयवंत शेडगे याने गट क्र.344/1 व तुकाराम दिनकर शेडगे याने गट क्र.343/1 येथे या दोघांनी त्यांचे स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीत ऊसाच्या शेतीमध्ये असलेल्या कांदयाच्या आंतरपिकात अफू या अंमली पदार्थाच्या बेकायदेशीर झाडांची लागवड केली असल्याबाबत मिळालेल्या माहितीवरुन याठिकाणी छापा टाकून संशयित गणेश शेडगे याच्या ताब्यातून अफूची 9.120 कि.ग्रॅ वजनाची 405 झाडे व तुकाराम शेडगे याच्या ताब्यातून 4.210 कि.ग्रॅ वजनाची 210 नग झाडे अशी एकूण 13.330 कि.ग्रॅ वजनाची 605 नग झाडे अशी एकूण 3,33,250/- किंमतीची अंमली पदार्थ अफूची झाडे जप्त करण्यात आली आहेत.
या कारवाईमध्ये सर्वश्री निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक अजयकुमार पाटील, सोमनाथ माने, संजय दिंडे, कैलास छत्रे, श्रीमती रुपाली गोसावी, सहा.दु.निरीक्षक महेश मोहिते, सचिन खाडे, जवान सागर आवळे, अजित रसाळ, अरुण जाधव, मनिष माने, राजेंद्र आवघडे, आबासाहेब जानकर, आप्पासो काळे, अजित घाडगे, सुरेश अब्दागिरे, महिला जवान राणी काळोखे यांच्यासह खंडाळा निवासी नायब तहसीलदार योगेश चंदनशिव, तलाठी शाम इंगोले, सातारा पोलीस दलाकडील फॅॉरेन्सिक सपोर्ट युनिटचे अनिल खटावकर, अमोल निकम, रुद्रायन राऊत, पोलीस पाटील सतीश शिंदे तसेच सातारा नगरपरिषदेकडील कर्मचारी संजय धादमे, श्रीकांत शिंपुकडे यांनी सहभाग घेतला. गुन्हयाचा पुढील तपास निरीक्षक माधव चव्हाण करीत आहेत.