कोयनेच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट बंद; ‘इतका’ TMC पाणीसाठा राहिला शिल्लक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातील पाण्यावर पिण्याच्या पाणी योजना अवंलबून आहेत. तसेच सिंचनाच्या तीन मोठ्या योजनांनाही पाणी पुरविले जाते. तर वीजनिर्मितीसाठीही पाण्याचा कोटा राखीव असतो. मात्र, यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रातच पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमेतेने भरलेच नाही. तर ९४ टीएमसीवरच धरणातील पाणीसाठा गेला होता. दरम्यान, सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी कमी झाल्याने कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या १ हजार ५० क्यूसेक वेगाने पाणी विसर्ग सुरू आहे. तर धरणात सध्या सुमारे ८४ टीएमसीच पाणीसाठा शिल्लक आहे.

परतीच्या पावसानेही दगा दिलयामुळे धरण भरले नसल्याने यंदा कोयनेतील पाणी तापू लागले आहे. त्यातच दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन पाणीसाठा राखीव ठेवण्याची सूचना असताना मागील आठवड्यात सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे मागील शनिवारपासून धरणाच्या पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला. सुरुवातीला एक युनिट सुरू करुन १,०५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात होते. त्यानंतर सिंचनासाठी आणखी मागणी वाढली. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पायथा वीजगृहाचे दुसरे युनीटही सुरू केले.

त्यामुळे सांगलीतील सिंचनासाठी एकूण २१०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यातच सांगलीतील सिंचनासाठी एकूण दोन टीएमसी पाणी सोडण्यात येणार होते. सध्या सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे शनिवारी सकाळपासून एक युनीट बंद करण्यात आले आहे. परिणामी एका युनीटमधूनच १,०५० क्यूसेक विसर्ग सुरू ठेवण्यात आलेला आहे.