भरधाव दुचाकीस्वारांची एकमेकांशी झाली समोरासमोर धडक; धडकेत एक जण ठार तर दोघे जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीसमोर भरधाव दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हि धडक इतकी भीषण होती कि यामध्ये एक तरुण ठार, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री ११ वाजता झाला.

नंदन सुदीप भट्टड (वय २५, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नंदन भट्टड हा मोळाचा ओढा येथून दुचाकीवरून एकटाच येत होता. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाजवळ तो आला असता समोरून आलेल्या भरधाव दुचाकीस्वाराने त्याला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, नंदन याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे तरुणही गंभीररीत्या जखमी झाले.

या तिघांनाही तातडीने साताऱ्यातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, नंदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर ते जखमी दोघेही तरुण अद्यापही बेशुद्ध असून, त्यांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नंदन भट्टड हा कापड व्यावसायिक सुदीप भट्टड यांचा मुलगा होता. शाहूपुरी पोलिस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नाही.