सातारा – लातूर महामार्गावर क्रेटाची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात एकाचा जागीच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा – लातूर महामार्गावर पुनवर्सन रोहोट बस स्टॅण्डसमोर दुचाकीला क्रेटाने समोरुन धडक दिली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. बाळू शंकर साळुंखे (वय 55, रा. खडकी) असे मृताचे नाव आहे. ते पळशी येथे हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी शाळेत अर्धा दिवस भरुन इलेक्ट्रॉनिक मोटारसायकलवरुन क्रमांक (MH 14 एलसी 3812) ते घरी निघाले होते. सातारा – लातूर महामार्गावर पुनवर्सन रोहोट येथील बस स्टॉपवर आले असताना धामणी येथील रहिवासी असलेले व सध्या नातेपुते,ता. माळशिरस येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले राजरतन सुदाम नागरगोजे (मूळ रा. धामणी, ता. माण व सध्या राहणार अकलूज ता माळशिरस) हे पत्नीसह त्यांच्या क्रेटा गाडी (क्रमांक MH 45 AQ 4056) या चारचाकीने मांढवे (ता. खटाव) या गावी निघाले होते.

त्यांच्या क्रेटा गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत बाळू साळुंखे जागीच ठार झाले. धडक दिल्यानंतर राजरतन नागरगोजे यांना अकलूज येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस व शंकर साळुंखे यांचे नातेवाईक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला असून, त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.