कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाने सोशल मीडियावर शिवसेना शिंदे गटातील तालुकाप्रमुखाने एक पोस्ट लिहिली आहे. या प्रकरणी तालुका प्रमुखावर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप या नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कराड तालुक्यातील शिंदे गटातील सर्व मोठ मोठ्या पदावर असलेले शिवसैनिक आहेत. यातील काकासाहेब जाधव हेही या ग्रुपमध्ये आहेत. त्यांनी या ग्रुपवर मुख्यमंत्र्यांना शंभूराज देसाई हे चुकीची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांना फसवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय अश्लील भाषेत शब्दही वापरले. यामुळे ग्रुपमधील गुलाबराव शिंदे यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला.
या तक्रारीत ग्रुपमधील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरुन सोशल मीडियावर पालकमंत्री देसाई यांची बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी रात्री त्यांना ताब्यात घेतले. शंभूराज देसाई यांच्या जवळचे काकासाहेब जाधव मानले जातात. अनेक कार्यक्रमात काकासाहेब मांडीला मांडी लाऊन बसतात. मात्र असे कोणते कारण झाले की त्यांनी शंभूराज देसाई यांच्याबद्दल असे अपशब्द वापरले याबाबत सध्या जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे.