सातारा प्रतिनिधी | सातारा ते कास रस्त्यावर कासाणी गावानजीक वळणावर दुचाकी घसरुन खाली पडल्याने झालेल्या अपघातात गणपतराव रतन कांबळे (वय 53, रा. अतित, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला. यामध्ये दुचाकीचालक जखमी झाला असून पोलिसांनी याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी ही अपघाताची घटना घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या घटनेमध्ये नागठाणे येथील बळीराम बाजीराव साळुंखे (वय 48) व गणपतराव कांबळे (रा. अतित) हे दोघे दुचाकीवरुन बामणोलीला चालले होते. सातारा ते कास रस्त्यावर कासाणी गावाच्या हद्दीत वळणावर दुचाकीचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावर पडली. यावेळी पाठीमागे बसलेले गणपतराव कांबळे तसेच बळीराम साळुंखे दोघेही रस्त्यावर पडले. त्यात गणपतराव कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर बळीराम साळुंखे जखमी झाले होते.
अपघातानंतर तेथून निघालेल्या वन विभागाच्या वाहनाने त्यांना तातडीने मदत केली. बळीराम साळुंखे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. अपघाताची घटना कळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. दुचाकी निष्काळजीपणे चालवून कांबळे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकीचालक बळीराम साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार वायदंडे तपास करत आहेत.