फरांदवाडीजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; भीषण अपघातात एकजण ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सातारा ते फलटण रस्त्यावर फरांदवाडी गावच्या हद्दीतील बुवा ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर फरार झालेल्या अज्ञात वाहनचालकाविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भीमराव दिनकर मदने (वय ५३, रा. कुरवली बुद्रुक (बरड), ता. फलटण) हे गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेल्याचे आहेत. अपघाताची फिर्याद शंकर मदने यांनी पोलिसात दिली. याबाबात अधिक माहिती अशी की, काल दि. १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास भीमराव दिनकर मदने हे मिरगाव येथील सांजोबा देवाच्या यात्रेवरून जेवण करून मोटारसायकलवरून (क्र. एमएच १४ बीएच २११०) परत येत होते.

यावेळी फरांदवाडी गावच्या हद्दीतील सातारा ते फलटण रस्त्यावर बुवा ढाब्याच्या १०० मीटर पुढे ते आले असताना एका अज्ञात वाहनावरील चालकाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात भीमराव मदने गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघाताचा अधिक तपास सपोनि नितीन नम करत आहेत.