कराड प्रतिनिधी | कराड ते पाटण रस्त्यावरील तांबवे फाटा येथे बुधवारी रात्री झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एक जण ठार झाला. राजेंद्र पांडुरंग चव्हाण (वय ६०, रा. साजूर, ता. कराड) असे ठार झालेल्याचे नाव आहे. तिघे जण गंभीर जखमी आहेत. अपघातामुळे वाहतूक काही खोळंबली होती. साजूरहून कराडला वाढदिवसाला जाताना अपघात झाला.
याबाबत माहिती अशी की, कराड – पाटण रोडवर शिवसमर्थ पतसंस्थेच्या समोर दुचाकी (एमएच ५० जे ७०८०) आणि दुसरी दुचाकी (एमएच ११ एए ७३१३) यांच्यात जोरदार धडक झाली. त्यात राजेंद्र चव्हाण यांचा मृत्यू झाला. अन्य ओंकार अंकुश पाटील, रणजित जगन्नाथ पाटील (रा. साजूर) आणि अजित जगदीश साळुंखे (रा. काले) तिघे जखमी आहेत.
अपघातातील जखमीवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.