सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात करण्यात आलेल्या घरफोडी प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाने सखोल तपास केला आहे. तपासातून एकाला अटक केली असून पोलिसांनी त्याच्याकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या घरातील तारांगण कार्यालय येथेही याच चोरट्याने चोरीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. चैतन्य विशाल माने (वय 19, रा. रविवार पेठ, सातारा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, दि. 19 डिसेंबर रोजी शाहूनगर येथील गणेश हौसिंग सोसायटीमध्ये बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्याने घरामध्ये प्रवेश करून घरातील कपाटातील सोन्याचे दागिने, जुन्या काळातील पितळेची भांडी, चिल्लरचा डबा याची चोरी केली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला.
डीबीचे पोलिस या प्रकरणाचा तपास करत असताना संशयिताकडे याप्रकरणी चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरीचा मुद्देमाल त्याने लपवून ठेवला होता. त्यानुसार पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त केला. त्याने आणखी काही गुन्हे केल्याची शंका पोलिसांना आल्यानंतर अधिक चौकशी केली असता डिसेंबर 2023 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या शाहूनगर येथील तारांगण या कार्यालयातदेखील चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्याठिकाणी मौल्यवान वस्तू नसल्याने चोरी केली नाही, असे चोरट्याने सांगितले. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोनि राजेंद्र मस्के, पोनि सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शाम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस किशोर जाधव, निलेश यादव, सुजीत भोसले, शंकर चव्हाण, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी कारवाईत सहभाग घेतला.