जावळीतील फळणी खूनप्रकरणी पैलवानाला अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांची कारवाई

0
13

सातारा प्रतिनिधी । जावळी तालुक्यातील फळणी येथील संजय गणपत शेलार (वय 32) यांचा खून झाल्याची घटना घडली होती. या खून प्रकरणी रामचंद्र तुकाराम दुबळे (38, रा. सैदापूर, ता. सातारा) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. संशयित दुबळे हा पैलवान असून त्याने खून केल्याची कबुली दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय शेलार यांना मारहाण झाल्यानंतर दि. 2 जानेवारी रोजी सकाळी त्यांचा मृतदेह अंधारी गावच्या हद्दीत आढळून आला. मेढा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे मारेकरी कोण? असा सवाल उपस्थित झाला. मेढा, वाई पोलिस तपास करत असताना त्यांना यश येत नव्हते. यामुळे फळणीचे ग्रामस्थ व शेलार कुटुंबिय आक्रमक झाले होते. मारेकर्‍यांचा तत्काळ शोध घ्यावा, यासाठी निवेदनेही दिली.

खूनप्रकरणी पोलिसांचा प्राथमिक तपास सुरू असताना अनेकांकडे चौकशी केली. शेलार कुटुंबिय तसेच ग्रामस्थांनी जे आरोप केले त्यानुसारही पोलिसांनी तपास केला. मात्र गेले 15 दिवस पोलिसांच्या हाती धागेदोरे मिळत नव्हते. बुधवारी या प्रकरणात अरुण कापसे यांना अटक करण्यात आली होती. मात्र, सुनावणीनंतर न्यायालयाने त्यांची जामीनावर मुक्तता केली होती.

अखेर गुरुवारी या प्रकरणातील मारेकर्‍याला पोलिसांनी पकडले. संशयित रामचंद्र दुबळे याला दुसर्‍या जिल्ह्यात पकडल्यानंतर रात्री उशीरा सातार्‍यात आणण्यात आले. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली आहे. पोलिस कोठडीसाठी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस त्याच्याकडे अधिक चौकशी करणार आहेत. यामुळे खुनाचे नेमके कारण काय? मारहाणीसाठी कोणत्या हत्याराचा वापर केला? याचा संपूर्ण तपास पोलिसानी सुरू केला आहे.