कराड तालुक्यातील ‘या’ गावाचा कौतुकास्पद निर्णय, अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी ‘ईद-ए-मिलाद’ची मिरवणूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | यंदा गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) एकाच दिवशी आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे कराड शहरातील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलादची मिरवणूक अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे वाघेरी, ता. कराड) येथील मुस्लिम बांधवांनी देखील सलोख्याचे दर्शन घडवत शुक्रवारी, दि. २९ मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सव आणि ईद सणानिमित्त कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघेरी (ता. कराड) येथे सोमवारी दुपारी सलोखा व शांतता समितीची बैठक झाली. अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, डीवायएसपी अमोल ठाकूर, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विजय पाटील, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे यांच्यासह वाघेरी परिसरातील हिंदू आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी सोशल मीडिया ग्रुप Admin नी ग्रुपचे सेटिंग Only Admin ठेवावे, असे आवाहन केले. तसेच सर्व समाज बांधवांच्या सण आणि उत्सवाला चांगल्या परंपरा आहेत. त्याला गालबोट लागू न देणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. आक्षेपार्ह बाबी टाळून गणेशोत्सव मिरवणुका आणि ईद ए मिलाद हे सण साजरे करा, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये कराड ग्रामीण मधील गणेशोत्सव मंडळांची आकडेवारी सांगितली. काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी, बहुतांश मंडळांच्या मुर्तींचे विसर्जन हे अनंत चतुर्दशीला तर ठराविक मंडळे दुसऱ्या दिवशी मुर्तींचे विसर्जन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास तात्काळ आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर म्हणाले, सण, उत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा करण्याची कराड तालुक्याला परंपरा आहे. ती परंपरा आपण कायम ठेऊया. सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने सामाजिक भान राखले पाहिजे. कोणाच्या भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाळल्या पाहिजेत. तसेच आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड न करता त्याबाबत पोलिसांना कळवावे.