मुलींनो छेडछाड झाल्यास करा ‘या’ नंबरवर कॉल, मिळेल तत्काळ मदत; कराड पोलिसांकडून हेल्पलाईन सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुली तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून अनेक उपाय केले जातात. एखाद्या महिलेची किंवा मुलीचे कुणी छेड काढल्यास किंवा तिला त्रास देत असल्यास संबंधितांवर कारवाई करण्यासाठी निर्भया पथक देखील स्थापन करण्यात आले आहे. दरम्यान आता या पथकाच्यावतीने संकटकाळात महिलांना पोलिसांशी तत्काळ संपर्क करता यावा यासाठी एक मोबाईल नंबर सुरु करण्यात आला आहे. तसेच कुणी छेड काढल्यास तत्काळ या नंबरवर कॉल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी कराड शहरातून आज जनजागृती रॅली काढण्यात आली.

कराड पोलीस उपविभागाच्या कराड निर्भया पथकाच्या वतीने कराड शहरातील महिला व युवतीही छेडछाड राखण्यासाठी एक विशेष मोहिमेची सुरुवात आजपासून करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मुली व महिलांसाठी एक हेल्पलाईन सुरु केली असून त्यासाठी 8482913737 हा फोन नंबर दिला आहे. कुणी छेड काढल्यास किंवा संकटाच्या काळात या नंबरवर मुलींनी तसेच महिलांनी कॉल केल्यास तत्काळ त्यांच्यापर्यंत पोलीस कर्मचारी पोहचणार आहेत. निर्भया पथकाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा आज कराड येथील दत्त चौकातून पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता निर्भया पथकाच्या वतीने या मोहिमेबाबत जनजागृती करणाऱ्या रॅलीस दत्त चौकातून सुरुवात करण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये निर्भया पथकातील पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, युवती तसेच महिला दुचाकीसह मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी शहरातील दत्त चौकातून सुरु झालेली दुचाकी रॅली मुख्य बाजारपेठ मार्गे शहरातून काढण्यात आली. तसेच यावेळी विद्यानगर येथील वेणूताई चव्हाण महाविद्यालय परिसरात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. रॅलीचा समारोप उपविभागीय पोलीस ठाणे परिसरात करण्यात आला.

महिला, युवतीच्यात धाडस निर्माण होणे आवश्यक : उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर

आतापर्यंत निर्भया हि एक मोहीम म्हणून चालवली जात होती. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या दृष्टिकोनातून आता हि चळवळ म्हणून प्रत्येकापर्यंत पोहचली पाहिजे. तसेच याचे प्रबोधन करण्यासाठी आज उपविभाग कराड येथील सर्व प्रभारी अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून आज निर्भया पथकाची दुचाकी रॅली आज काढण्यात आली आहे. यामागचा मुख्य उद्देश असा आहे कि कराड शहरात शहराच्या आजूबाजूच्या परिसरातुन मोठ्या संख्येने महिला व युवती वर्ग येत असतो. त्यांना त्यांच्याशी असणारे जे काही सर्व कायदे आहेत त्याची त्यांना माहिती मिळावी. त्यातून त्यांच्यामध्ये धाडस यावे. जेनेकरून त्यांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला प्रतिकार करावा यासाठी त्याच्याजवळ एक फोन नंबर असणे आवश्यक आहे. यासाठी आजपासून आम्ही एक स्वतंत्र असा फोन नंबर कार्यान्वित केला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक अमोल ठाकूर यांनी दिली.