सातारा प्रतिनिधी । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून उद्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानास काही तास उरले असून सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात निवडणूक विभागाकडून मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात झाली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात प्रथम वाई विधानसभा मतदारसंघांमध्ये सर्वात दुर्गम असलेल्या चकदेव मतदान केंद्राचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर इतर आठ विधानसभा मतदार संघात मतदान यंत्र वाटपास सुरुवात करण्यात आली.
मतदानास काही तास उरले असताना निवडणूक विभागाकडून सातारा एमआयडीसी गोडाऊन येथे आज सकाळची डेमो ट्रेनिंग घेण्यात आले. तसेच मतदान केंद्रावर जाणाऱ्या अधिकारी, केंद्रप्रमुख यांना बुथ निहाय मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले.
कराडला मतदान यंत्रे घेऊन एसटी मतदान केंद्रांकडे रवाना
२६० कराड दक्षिण मतदार संघाच्या मतपेट्या व साहित्य रत्नागिरी गोडावुन, मार्केटयार्ड येथे ठेवण्यात आले होते. तर २५९ कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या मतपेट्या व साहित्य स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी ठेवण्यात आले होते. यासाहित्यांचे आज सकाळी सात वाजल्यापासून वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली. कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात स्ट्रॉंगरूममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन्स बाहेर काढण्यात आल्या. त्या संबंधीत मतदानबुथ केंद्र अधिकाऱ्यांना तपासून देण्यात आल्या. त्यानंतर साहित्य आणि अधिकारी यांना घेऊन एसटी चालक मतदान केंद्राच्या दिशेने रवाना झाले.
कराड उत्तरामध्ये मतदान यंत्रांचे वाटप
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण 1 लाख 55 हजार 359 पुरुष, 1 लाख 50 हजार 837 स्त्री व इतर 7 मतदार असे एकूण 3 लाख 6 हजार 203 मतदार आहेत. त्यापैकी 2 हजार 235 सैनिक मतदार असून सर्व मतदारांची मतदान ओळखपत्रे फोटो सहीत उपलब्ध झाली आहेत. एकूण 356 मतदान केंद्रे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात आहेत. या मतदान केंद्राकडे आज मंगळवारी मतदान कर्मचारी आपले मतदानाचे साहित्य घेताना व केंद्राकडे रवाना झाले.
चकदेव मतदान केंद्रास जाण्यास १.५ तास पायी करावा लागतो ट्रेक
वाई मतदारसंघात अति दुर्गम अशा चकदेव मतदान केंद्रावर जाण्यासाठी पथकाला १.५ तास पायी ट्रेक करून जावे लागते. दुर्गम भागात मतदान यंत्राच्या सुरक्षेसाठी आयोगाने दिलेल्या विशेष बॅकपॅक सह मतदान यंत्र देण्यात आले. पथकातील अधिकारी / कर्मचारी यांचे प्रशासनाच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
पाटणला युवा मतदान केंद्र व सखी मतदान केंद्रावर हिरकणी कक्ष
२६१ पाटण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. ४२४ मतदान केंद्रांसाठी एकूण १ हजार ६९६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १३१ जीप व ५० एसटी बस असे एकूण १८१ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. उद्या दि. २० रोजी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पाटण तालुक्यात युवा मतदान केंद्र व सखी मतदान केंद्रावर तयारी पूर्ण करण्यात आली आहे.