आमची प्रमुख लढत बाळासाहेब पाटलांशीच; निवास थोरात यांनी दंड थोपटले

0
1227
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । “आमची प्रमुख लढत विद्यमान चेअरमन आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशीच आहे. आम्ही प्रामाणिकपणे सभासदांचे प्रश्न मांडत आलोय. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना न्याय देण्यासाठी आम्ही हि निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे,” असं म्हणत स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख उमेदवार निवास थोरात यांनी बाळासाहेब पाटील यांना फुल्ल आव्हान दिलं आहे. तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आमच्यासोबतच आहेत, असा दावाही निवास थोरात यांनी करत सह्याद्री सहकारी साखर कारखानाच्या निवडणुकीत खळबळ उडवून दिली आहे.

स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख उमेदवार निवास थोरात यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना न्याय देण्यासाठी आम्ही हि निवडणूक लढण्याची भूमिका घेतलेली आहे. सभासदांनी सांगितलं कि निवडणूक लढा.. आमची प्रमुख लढत विद्यमान चेअरमन आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशीच आहे. आमची निवडणूक तिसऱ्या पॅनलशी मुळातच नाही. आम्ही प्रामाणिकपणे सभासदांचे प्रश्न मांडत आलोय.

आमच्या पॅनलमध्ये सातत्याने १५-२० वर्षे काम करणारी लोक आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांनी आमच्यासोबत येऊन लढा उभा केलाय. भिकुनाना किवळकर, चोरेकर, आबासाहेब पार्लेकर, माधवराव जाधव, स्व. आनंदराव अप्पा, स्व. हिंदुराव चव्हाण, विठ्ठलतात्या असतील या सर्वांच्या कुटुंबातील लोक आमच्यासोबत आहेत.. त्यामुळे एकत्र येऊन सह्याद्रीच्या सभासदांना न्याय देण्यासाठीच आम्ही हि भूमिका घेतली आहे असं निवास थोरात यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा निवास थोरात यांनी केला. मी मागील ३ महिन्यापूर्वी वारसनोंदींचे जे निवेदन देणार होतो. त्याच्या आधी मी याबाबत आणि सह्याद्री साखर कारखान्याच्या एकूण कामकाजाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली होती. “तू बोललं पाहिजे, लोकांच्या अडचणी मांडल्या पाहिजेत,” असं पृथ्वीराज बाबा मला त्यावेळीच म्हणाले होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही बाहेर पडलोय, आणि उमेदवारी अर्ज भरले आहेत. विद्यमान चेअरमन लोकांची दिशाभूल करत असून पृथ्वीराज चव्हाण आमच्याच सोबत आहेत, अशी माहिती निवास थोरात यांनी दिली.