आमदारकीप्रमाणे सह्याद्री कारखान्याचे चेअरमन पदही जाणार; निवास थोरात यांची बाळासाहेब पाटलांवर टीका

0
1152
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील सभासद शेतकरी हा प्रामाणिकपणे आपला ऊस कारखान्यात घालत आला आहे. काबाडकष्ट करून घाम गाळून तो रात्रंदिवस शेतात राबून आपला ऊस पिकवतो आणि तो कारखान्यास घालतो. त्या सभासद बांधवांच्या उसाला जास्तीत जास्त दर देणे आवश्यक होते. मात्र, ते पुण्याचे काम विद्यमान चेअरमन यांना जमले नाही. त्यांनी केलेल्या कर्माची फळे म्हणून की काय त्यांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. विधानसभेप्रमाणे आता सह्याद्री कारखाना निवडणुकीत चेअरमन पद देखील जाणार असल्याने त्याचा पराभव त्यांना समोर दिसू लागला असल्याची टीका स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख उमेदवार निवास थोरात यांनी केली.

सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे दोनच दिवस राहिल्याने मोठ्या प्रमाणात उमेदवारांकडून प्रचार केला जाणार आहे. यामध्ये स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलचे प्रमुख उमेदवार निवास थोरात देखील जोमाने प्रचार करत आहेत. दरम्यान, त्यांनी आज कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सभासद बांधवांची भेट घेत संवाद साधला. यावेळी निवास थोरात म्हणाले की, सातारा, कराड, खटाव, कडेगाव, कोरेगाव या तालुक्यातील २३४ गावांत कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. निवडणुकीसाठी ३२ हजार २०५ मतदार पात्र असून, दिनांक ५ एप्रिलला मतदान होणार आहे. सह्याद्रीची निवडणूक तब्बल २५ वर्षांनी होत असून यावेळी पहिल्यांदाच तीन पॅनेलमध्ये लढत होत आहे.

आपल्याला काहीही झालं तरी ही निवडणूक जिंकायची आहे. कोणत्याही परिस्थितीत स्व. यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून कारखान्याची निवडणूक लढवत आहोत. त्यास शेतकऱ्यांचा जाहीर पाठिंबा लाभत असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले.