राज्यात नवीन 53 अपर तहसील कार्यालय; सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण प्रतिनिधी | राज्यातील काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेले नागरीकरण, वाढलेली लोकसंख्या, विकासात्मक कामे, जमिनींविषयक वाढते दावे आदी कारणांमुळे राज्यात नवीन 53 अपर तहसील कार्यालय निर्मितीचे प्रस्ताव महसूल विभागाकडे दाखल झाले आहेत. याला मान्यता मिळाल्यास मोठ्या तालुक्यांचे विभाजन करून तेथे अपर तहसील कार्यालय स्थापन होणार आहे. त्याचबरोबर नागरिकांची गैरसोय दूर होणार असून कामे गतीने मार्गी लागतील. यामध्ये फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे सुद्धा अपर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

शहरालगतच्या तालुक्यांमध्ये तसेच औद्योगिकीकरण झालेल्या तालुक्यातील महसूल अधिकाऱ्यांकडील कामे होण्यास वेळ लागतो. तसेच काही जिल्हा मुख्यालये आणि तालुक्‍यांची ठिकाणे भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीची आहेत. महसूल कार्यालयांची फेररचना अथवा निर्मिती करण्याबाबत नागरिकांसह लोकप्रतिनिधींनीही शासनाकडे मागणी केली आहे.

महसूल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात फेरबदल, निर्मिती ही खर्चिक व सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणारी बाब असल्याने याबाबत पूर्ण विचारांती अव अभ्यासांती निर्णय होणे आवश्‍यक आहे. म्हणून शासनाने एक समिती स्थापन केली. या समितीच्या बैठकाही झाल्या आहेत, अशी माहिती महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. या समितीच्या अहवालानंतर शासनाकडून निर्णय घेतला जाणार आहे.