सातारा प्रतिनिधी | फलटण शहरासह तालुक्यामध्ये पावसाने खूपच नुकसान केले असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी NDRF चे पथक फलटणमध्ये काल रात्री दाखल झाले आहे. अशा परिस्थितीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील हे जनतेच्या सवेसाठी तत्पर असल्याचे त्यांनी कृतीतुन दाखवुन दिले आहे.

आमदार सचिन पाटील यांच्यासमवेत NDRF च्या पथकाने सस्तेवाडी येथील पूरपरिस्थीची पाहणी केली असून, मदतीसाठी पथक फलटण येथे सज्ज आहे. सस्तेवाडीमधील वाबळेवस्ती येथे बाणगंगा नदी व सस्तेवाडीच्या ओढ्याच्या घेरावामुळे जवळपास ४० ते ५० नागरिक अडकले होते. त्याठिकाणी आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर, निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे यांनी पाहणी करून NDRF च्या पथकाच्या माध्यमातून सदरील नागरिकांना सुखरूप रित्या स्थलांतरित करण्यात आले आहे.
NDRF पथकाच्या प्रयत्नांमुळे नागरिकांना सुरक्षितता प्रदान करण्यात यश मिळाले आहे. स्थानिक नागरिकांनीही NDRF पथकाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. बचाव कार्यात NDRF च्या पथकाने चांगली कामगिरी केली आहे.
फलटण शहरामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वत: पायी दौरा केला तर सर्व कार्यकर्तांना अॅक्टिव्ह राहण्याचे निर्देश सुध्दा त्यांनी दिले होते. यासोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातुन स्वत:चा पर्सनल मोबाईल नंबर सुध्दा शेअर करत कधीही कसल्याही मदतीसाठी आपण तत्पर असल्याचे स्पष्ट केले होते.
फलटण तालुका प्रशासनाला सोबत ठेवत जागीच पंचनामे करण्याचे व आवश्यक त्या ठिकाणी मदत पोहचवण्याचे निर्देश सुध्दा आमदार पाटील यांनी यावेळी दिले.