कराड प्रतिनिधी । राज्यात शिंदे-फडणवीस सरकारकडून जनतेचे अनेक प्रश्न सोडवले जात नाहीत. राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका पालिका, नगरपालिका यांवर प्रशासक आहेत. या सरकारमध्ये निवडणूका घेण्याचे धाडस करत नाही. कारण त्यांना निवडणुका घेतल्या तर धक्का बसू शकतो हे चांगले माहिती आहे. या सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केला नसल्यामुळे एका मंत्री महोदयांकडे अनेक खात्यांची जबाबदारी आहे, कोणत्याही विभागाला न्याय मिळत नाही, यामुळे जनतेचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे आज राज्याच्या विकासाला खीळ बसली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर केली.
अपशिंगे, ता. कोरेगाव येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, कोरेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शहाजीराव क्षीरसागर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन जयवंतराव घोरपडे, कांतीलाल पाटील, संभाजीराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी अपशिंगे गावातील विविध विकास कामांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले. यामध्ये स्थानिक विकास निधीतून मारूती मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, जनसुविधा योजनेतून अपशिंगे येथे स्मशानभूमी निवारा शेड बांधणे व सुशोभिकरण करणे, राष्ट्रीय जल पेय योजनेतून अपशिंगे येथे पिण्याच्या पाण्याची योजना करणे, आमदार स्थानिक विकास निधीतून ग्रामपंचायत मालकीच्या जागेत खंडोबा मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, डोंगरी विकास निधी योजनेतून अपशिंगे येथे श्री महादेव मंदिरासमोर सामाजिक सभागृह बांधणे, अर्थसंकल्प मार्च- २०२२ मधून राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी ते खिरखिंड-एकंबे-कण्हेरखेड अपशिंगे-साप-पिंपरी -वाठार किरोली रस्ता प्रजिमा ३३ अ कि.मी.९/५०० ते १२/०० (भाग-एकंबेशिंगे) सुधारणा करणे, लघु पाटबंधारे योजनेतून हि विकास कामे करण्यात आली आहेत.
अपशिंगे येथील पाझर तलाव नं. २ दुरूस्ती करणे, सर्वसाधारण साकव योजनेतून अपशिंगे येथे म्हसोबा जवळच्या ओढ्यावर साकव पूल बांधणे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून अपशिंगे ता.कोरेगांव येथे बौध्दवस्तीकडे जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, २५१५ इतर ग्रामीण विकास योजनेतून अपशिंगे ता.कोरेगांव येथे अपशिंगे ते नवलेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, जलजिवन योजनेतून अपशिंगे येथे विहीर दुरूस्ती करणे, नवलेवाडी वसाहतीमधील विहीरीचे खोलीकरण व आर.सी.सी. बांधकाम करणे. यामधील पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन व नव्याने मंजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.