कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे आज शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. याबाबत राज्याचे माजी सहकार मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे पत्रकार परिषदेतून आपली भूमिका स्पष्ट केली. “राज्यात घडलेल्या घडामोडीची मला कसलीच माहिती नाही. यापुढे जी शरद पवारांची भूमिका आहे तीच आपली असेल. राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे. याबाबत मला प्रसारमाध्यमांमधूनच माहिती मिळाली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आ. बाळासाहेब पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज सकाळी आमच्या पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत पक्षातील काही आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे समजले. याबाबत पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार लवकरच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यामध्ये पवार साहेब पक्षाच्या आगामी वाटचालीसंदर्भात ते जी भूमिका घेतील, तीच माझीही भूमिका राहणार आहे.
शपथविधीबाबत मला कोणत्याही स्वरूपाची माहिती नव्हती. आम्हाला पक्षाकडून जे काही कार्यक्रमाचे निरोप मिळतात त्यानुसार आम्ही त्या कार्यक्रमांना जात असतो. मात्र, पक्षातील काही आमदारांच्या अशा गोष्टींबाबत मला माहिती नव्हते. अजितदादा किंवा जयंत पाटील या कोणाशीच माझे कसलेच बोलणेही झालेले नाही. टिव्हीवरती पाहिलं तेव्हाच मला याबाबत सगळं कळलं,असे आ. पाटील यांनी सांगितले.
खा. शरद पवार उद्या कराडला येणार : आ. बाळासाहेब पाटील
यावेळी आ. बाळासाहेब पाटील यांनी उद्या सोमवार, दि. 3 रोजी खासदार शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याबाबत सांगितले. खा. पवार साहेब सकाळी १० वाजता कराड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते सातारा येथील नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत. दरम्यान, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेबांना मानणाऱ्या राज्यातील आमदार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कराड येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनावेळी उपस्थित रहावे, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले.