पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दमदार पाऊस होत असून महाबळेश्वरला बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक ७५ मिलीमीटरची नोंद झाली. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगर येथे १७१ तर नवजाला २०२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे.
जिल्ह्यात यावर्षी वळीव तसेच मान्सून पूर्व पाऊस कमी झाला. पण, मान्सूनचा पाऊस वेळेवर दाखल झाला आहे. ६ जूनपासूनच जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. सुरुवातीला पश्चिम भागातील घाट परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. महाबळेश्वर, कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात धुवाॅंधार पाऊस पडला. त्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस होण्यास सुरूवात झाली. मागील आठ दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला लवकर सुरूवात झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे पडलेला आहे. तसेच पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या दुष्काळी भागातही दमदार हजेरी लागली आहे. त्यामुळे ओढ्यांना पाणी वाहिले. तसेच बंधाऱ्यातही पाणीसाठा झाला आहे. त्यातच शेत जमिनीत पाणी साठल्याने खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येणार आहे. त्याचबरोबर जावळी, पाटण, कराड, वाई या तालुक्यातही पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे.
कोयना धरणात १४ टक्के साठा
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना आणि नवजालाही अवघ्या पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर मागील ११ दिवसांत कोयनेला १७१ मिलीमीटर पाऊस पडला आहे. धरणात १५.२३ टीएमसी पाणीसाठा आहे. टक्केवारीत हे प्रमाण १४.४७ आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर येथे ७५ मिलीमीटर पडला आहे. एक जूनपासून महाबळेश्वरला १७१ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.