कराड प्रतिनिधी । स्व. सौ. वेणुताई चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. १ जून) सायंकाळी ६ वाजता सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
सौ. वेणुताई यशवंतराव चव्हाण यांची ४१ वी पुण्यतिथी शनिवार दि. १ जून २०२४ रोजी आहे. सौ. वेणुताई चव्हाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने दरवर्षीप्रमाणे या दिवशी सौ. वेणुताई चव्हाण यांच्या स्मृतींना आदरांजली वाहणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन सौ.वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात केलेले आहे.
अभिजात संगीताचे रसिक आणि जाणकार असलेल्या दिवंगत यशवंतरावांच्या मुंबई व दिल्लीमधील घरी दिग्गज कलाकारांचा नेहमीच राबता असे. अनेकदा या कलाकारांचे कार्यक्रम घरी होत असत. सौ. वेणुताई स्वतः त्या कार्यक्रमांचे देखणे आयोजन करत. सौ. वेणूताईंच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रथा यशवंतरावजींनी सुरु केली होती. हीच परंपरा कायम राखत ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावर्षी आघाडीचा युवा गायक मयूर महाजन व झी सारेगम विनर आणि इंडियन आयडॉल फेम अंजली गायकवाड ही द्वयी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना अविनाश पाटील (तबला), अंगद गायकवाड (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज),, आशिष कदम (कीबोर्ड), आणि शिवाजी डाके (तालवाद्य) यांची साथसंगत लाभणार आहे. अभंग, भक्तिगीते व नाट्यगीतांचा हा कार्यक्रम कराडमधील रसिकांना पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमास सर्व यशवंतप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन कराड उत्तरचे आमदार आणि ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.