कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील कुसूर येथून राहत्या घरातून एक व्यावसायिक बेपत्ता झाला होता. त्या व्यावसायिकाचा मृतदेह गुरुवारी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. याप्रकरणी शिवाजी लक्ष्मण सावंत (वय ५२, रा. कुसूर) यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद तालुका पोलिसात झाली होती. पोलिसांनी अधिक तपास केला असता संबंधिताचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले होते. याप्रकरणी अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कुसूर येथील शिवाजी सावंत हे किराणा दुकानदार होते. गावात ते आणि त्यांचा भाऊ बाळासाहेब, तसेच इतर कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होते. एक सप्टेंबरला शिवाजी सावंत हे रात्री आठच्या सुमारास जेवण करून झोपण्यासाठी गेले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपासून ते कोणालाही दिसले नाहीत. रात्रीपर्यंत ते घरी परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. मात्र, ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे भाऊ बाळासाहेब सावंत यांनी याबाबतची फिर्याद तालुका पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार शिवाजी सावंत बेपत्ता असल्याबाबतची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
गुरुवारी (ता. ५) सकाळी कुसूर येथील सोनारडोह नावच्या शिवारात संतोष खाडे यांच्या शेतामध्ये शिवाजी सावंत यांचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. शवविच्छेदनात मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून, धारदार शस्त्राने वार केल्यामुळे शिवाजी सावंत यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.