खा. उदयनराजेंनी घेतली माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकरांची भेट; भेटीमागचं सांगितलं ‘हे’ कारण

0
5

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. अगोदरच पालकमंत्री पदावरून विद्यमान कॅबिनेट मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरु असताना पाटण तालुक्यात राजकीय घराण्यातील वारसदारांची एकत्रित भेट झाल्याने पुन्हा तर्क वितर्क लढवले जात आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच सातारा जिल्ह्यातील पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या शिक्का मॅन्शन या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट दिली. तब्बल दोन ते तीन तास चर्चा देखील झाली. या भेटीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी नेमकी कोणत्या कारणासाठी भेट घेतली त्यामागचे कारणही सांगून टाकले आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भेटीनंतर एक फेसबुक पोस्ट केली असून त्यामध्ये भेटीमागचे कारण सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा ८१ वा वाढदिवस तर त्यांचे नातू व सत्यजितसिंह पाटणकर यांचे सुपुत्र अर्जुनसिंह व श्रीमंत हर्षनिल महागांवकर यांच्या सुकन्या सौ. वैभवीदेवी यांचा विवाह संपन्न झाला हा होता. या दोन्ही सोहळ्यास उपस्थित राहणार होतो मात्र न टाळता येणा-या कार्यक्रमामुळे ते बाहेरगावी असल्याने त्यावेळी ते उपस्थित राहू शकले नव्हते म्हणूनच त्यांनी आज सदिच्छा भेट देत दोन राजघराण्यांचे ऋणानुबंध व हितसंबंध जपले.

मुळातच इतिहासापासून युगपरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीमंत सरदार पाटणकर घराण्यांचे ऋणानुबंध व नातेसंबंध सर्वज्ञात आहेत. राजमाता श्रीमंत स्व. सुमित्रा राजे भोसले, स्व..प्रतापसिंह राजे भोसले,,स्व.अभयसिंह राजे भोसले, स्व. शिवाजीराजे भोसले यांचेसह, माझ्याबरोबर तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या छत्रपती घराण्यातील महनीय व्यक्तीं आणि सरदार पाटणकर घराण्यांच्या पिढ्यांनी देखील हेच ऋणानुबंध व नातेसंबंध कायम जपले आहेत. याचीच झलक या सदिच्छा भेटीतून अनुभवायला मिळाली.

पराक्रम, संस्कार आणि जनहित कायमच जपणारी ही दोन घराणी सुखदुःखातही एकमेकांशी घट्ट असतात. सामाजिक, धार्मिक ऋणानुबंध जपताना या घराण्यांनी राजकारणा पलीकडे जाऊनही अनेकदा आपले नाते व हितसंबंध जपल्याचे सर्वज्ञात आहे. रामदास स्वामींनी दिलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती यातूनच पाटणकर यांच्या वाड्यात साकारलेले श्रीराम मंदिर याचा देखील कायमच उल्लेख केला जातो. या दोन्ही घराण्यांशी निगडित पराक्रम, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा याचा एकदिलाने केला जाणारा प्रयत्न यासाठी छत्रपती व सरदार पाटणकर घराण्याचे हेच ऋणानुबंध वेळोवेळी पहायला मिळाले आहेत.

अडीच ते तीन तास विविध विषयांवर सखोल चर्चा

यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचे आशीर्वाद घेतले व नव वधूवरांना भावी जीवनासाठी आपल्या खास शैलीत शुभेच्छाही दिल्या. यावेळी विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यामध्ये तब्बल अडीच ते तीन तास विविध विषयांवर सखोल चर्चा झाली.

खा. उदयनराजेंच्या भेटीवेळी पाटणकर कुटुंबातील हे सदस्य होते उपस्थित

यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, सौ. यशस्विनीदेवी पाटणकर, श्रीमंत हर्षनिल महागांवकर, युवा उद्योजक याज्ञसेन पाटणकर, अर्जुनसिंह पाटणकर, सौ, वैभवीदेवी पाटणकर, माजी शिक्षण सभापती सुनील ( तात्या ) काटकर, सागर राजेमहाडिक, काका धुमाळ, बाळासाहेब ढेकणे ( माजी नगरसेवक ), यश राजेमहाडिक, रवी पाटील, सम्राट घेवारी, विश्वजीत पाटणकर, संदीप लोहार आदी मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.