कोयना धरणातून वीज निर्मितीपेक्षा सिंचनासाठी पाण्याचा जास्त वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. अशात कोयना धरणातील चालू जलवर्षात सुमारे ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग सिंचनासाठी झाला आहे. कोयना धरणाचे जलवर्ष हे १ जून २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीचे असून, १०५.२५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेल्या कोयना धरणामध्ये चालू जलवर्षी पावसाने ओढ दिल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. त्यामुळे सुमारे १५ टीएमसी धरणाच्या पाणीसाठ्याची तूट निर्माण झाली असल्यामुळे सुरुवातीपासूनच पाणीकपातीची टांगती तलवारीची चर्चा होती.

मागील दोन वर्षे लवादाच्या निर्धारित ६७.५० टीएमसी पाणीसाठ्यापेक्षा अनुक्रमे ८२ व ७१ टीएमसी असा अतिरिक्त पाण्याचा वापर करून कोयना प्रकल्पाने संकटकाळी वीजनिर्मिती करून मोठा हातभार लावला होता. लवादाने आरक्षित केलेली ६७.५० टीएमसी पाणीसाठ्याचा पूर्ण वापर होण्याची शक्यता मावळली आहे. राज्यातील इतर वीजनिर्मिती प्रकल्पांपेक्षा जलविद्युत प्रकल्पाची वीजनिर्मिती कमी खर्चात होत असली तरी चालूवर्षी वीजनिर्मितीस बाजूला सारत पूर्वेकडील भागाला विक्रमी ४५ टीएमसी पाण्याचा विसर्ग केल्याने सिंचनासाठी प्राधान्य देण्यात आले आहे.

या धरणातील पाणी अधिक करून सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच सोलापूर जिल्ह्यातील योजनेसाठीही कोयनेचे पाणी सोडण्यात येते. सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी आजही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या २१०० क्यूसेकने सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे. याच धरणात आता १८.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. १९.१९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.

मागील चौदा वर्षांत सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग

२००९-१० पाण्याचा विसर्ग -१७.३९ टीएमसी
२०१०-११ – १४.४० टीएमसी
२०११-१२ – २१.४२ टीएमसी
२०१२-१३ – २८.४२ टीएमसी
२०१३-१४- २२.९६ टीएमसी
२०१४-१५ – २१.९५ टीएमसी
२०१५-१६ – ३७.२४ टीएमसी
२०१६-१७ – ३५.७२ टीएमसी
२०१७-१८ – २९.८९ टीएमसी
२०१८-१९ – ३९.३७ टीएमसी
२०१९-२० – २६.८२ टीएमसी
२०२०-२१ – ३५.१५ टीएमसी
२०२१-२२ – २२.९१ टीएमसी
२०२२-२३ – ४०.७६ टीएमसी
दि ३१ मे रोजी सकाळी ४५.१९ टीएमसी