सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मान्सूनच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची पूर्व तयारी केली जात आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून मान्सून सातारा जिल्ह्यात दाखल झाला असून गुरूवारी रात्रीपासून पश्चिम भागात चांगला पाऊस पडला. कोयना, नवजासह महाबळेश्वरलाही हजेरी लावली. तसेच पूर्व भागातही अनेक ठिकाणी पाऊस पडला. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जावळी, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचा पाऊस दाखल होतो. पावसाला सुरूवात झाली की खरीप हंगाम पेरणीला सुरूवात होते. तत्परवी शेतकऱ्यांकडून बीबियाणे खरेदी केली जातात. गेल्या काही वर्षात मान्सूनचा पाऊस उशिरा येत असल्याचे दिसून आले. पण, यावर्षी मान्सूनचे देशात तसेच महाराष्ट्रातही वेळेवर आगमन झाले आहे. गुरूवारी तळकोकणात मान्सून आला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातही आनंद सरी कोसळू लागल्या आहेत.
गुरूवारी दुपारपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस पडू लागला आहे. तर सातारा शहरात रात्री ११ नंतर
पावसाला सुरूवात झाली. बराचवेळ पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट बाही लागले.
तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण या तालुक्यातील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली. यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातही पाऊस पडला. यामुळे बळीराजांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सातारा जिल्हा परिषदेकडून बियाणे खरेदीसाठी अनुदान
सातारा जिल्हा परिषदेची ठराव समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. यामध्ये खरीप हंगामात अनुदानावर बियाणेसाठी जिल्हा परिषदेच्या ठराव समितीत ३० लाख रुपये खर्चास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने यावर्षीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात अनुदानावर बियाणे मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भात, ज्वारी, बाजरी, सोयाबीन, वाटाणा, घेवडा आदींचे बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहे.
१० जूनपर्यंत पडणार जोरदार पाऊस
हवामान विभागाने जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केल्यामुळे १० जूनपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची तसेच घाट क्षेत्रातील महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि वाई तालुक्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोयनेत २१ मिलीमीटर पावसाची नोंद
जिल्ह्याच्या पश्चिम भागातील घाट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडू लागला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २१ मिलीमीटर पावसाची नोंदनों झाली आहे. त्यामुळे पावसाचा जोर वाढल्यास धरणात लवकरच पाणी आवकही सुरू होण्याची शक्यता आहे. तर नवजा येथे १४ आणि महाबळेश्वरला १२ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. एक जूनपासून महाबळेश्वरला प्रथमच पाऊस पडला आहे.