सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे भरदिवसा माकडाने धुमाकूळ घालत अनेकांच्या घरातील टीव्ही फोडून महिलेवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी घडली. या हल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजश्री विलास जाधव (रा. अहिरे) असे जखमी महिलेचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून अहिरे परिसरात माकडांची उच्छाद मांडला आहे. ही माकडे अन्नाच्या शोधात या घरातून त्यावर उड्या मारत आहे. अनेकदा ही माकडे घरात शिरून धुमाकूळही घालताना दिसत आहे.
त्यात अनेकांच्या टीव्ही, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि संसारोपयोगी साहित्याची मोडतोड करत आहेत. मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राजश्री जाधव यांच्या घरात माकड शिरले. त्याला हटविण्याचा प्रयत्न केला असता माकडाने हल्ला केला. यात त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.