पाटण प्रतिनिधी | कराड- चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था व लेखी आश्वासन देऊनही केलेल्या टोलवाटोलवी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गोरख नारकर यांनी कालपासून येथील प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषण मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कायम राहिले.
वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने, उपोषणे करूनही राष्ट्रीय महामार्ग व संबंधित प्रशासन कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे. कराड- चिपळूण रस्त्याच्या कामाबाबत अनेक तक्रारी होऊन वारंवार बैठका देखील झाल्या. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. उपोषणा दरम्यान केलेल्या मागण्यांची पूर्तता झाल्याशिवाय आंदोलन स्थगित करणार नाही.
उपोषण ठिकाणी येऊन गोड बोलण्याला भाळणार नाही. राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी करमणूक कार्यक्रमाला गेल्यासारखे आंदोलन पाहायला येतात. त्यांना आंदोलनाचे गांभीर्य नाही. संबंधित कंपनी व ठेकेदाराविरोधात कारवाई केल्यावरच मनसेचे आंदोलन स्थगित होईल, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवू, असा इशारा नारकर व मनसे पदाधिकारी यांनी दिला आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पोलिस निरीक्षक अविनाश कवठेकर यांनी भेट दिली. दरम्यान, दयानंद नलावडे, राहुल संकपाळ, भाजप समन्वयक विक्रमबाबा पाटणकर, अक्षय देसाई, संपत देसाई, बापू टोळे, संजय पवार, बळीराम गायकवाड, चंद्रकांत देसाई यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.