सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या संख्येने महिलांकडून अर्ज भरले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी नुकतेच एक वादग्रस्त विधान केले आहे. “निवडणुकीनंतर स्क्रूटिनी कमिटीची बैठक आहे, त्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून नावं डिलीट करण्यात येतील. डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. यात कोण पात्र आणि कोण अपात्र आहे हे ठरेल. गावातली लोक त्यांच्या आमदाराला ओळखतात. गावागावातील कोपऱ्या-कोपऱ्यात कोण राहतंय हे माहिती आहे. या इलेक्शनमध्ये पुढे पुढे करणाऱ्यांची नावं काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू, असे आमदार महेश शिंदे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार महेश शिंदे यांनी नुकतीच एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी आमदार शिंदे यांनी लाडकी बहीण योजेनवरुन बोलताना त्यांनी मतदारसंघातल्या विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी आ. शिंदे म्हणाले की, भाकरवाडी येथील एका व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर पडलं होतं की मुख्यमंत्रीसाहेब, तुमची लाडकी योजनेचे 1500 रुपये आम्हाला नकोत. आम्हाला आरक्षण द्या. त्यावर मी त्याला फोन करून विचारलं की, तुला आरक्षण दिलं आहे. अजून काय पाहिजे? तुझ्या घरच्यांनी अर्ज केलंय का?
त्यावर तो बोलला की अर्ज केलाय. तुझ्या घरच्यांचं नाव सांग ते मी डिलीत करतो. त्यावर तो म्हणाला कि असं कसं काय होणार? त्यावर मी म्हणालो कि, डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी कमिटीची बैठक आहे. स्क्रुटिनी निवडणुकीनंतर आहे कोण पात्र आणि कोण अपात्र आहे हे ठरेल. तुमच्या आमदाराला तुम्ही ओळखतात. गावागावातील कोपऱ्या-कोपऱ्यात कोण राहतंय हे माहिती आहे. या इलेक्शनमध्ये पुढे पुढे करणाऱ्यांची नावं काढा, आपण त्यांचा कार्यक्रम डिसेंबरमध्ये करू, असा शब्द देतो.
शिंदेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांची टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार महेश शिंदेंच्या या वक्तव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी टीका केली आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं ही योजना आणल्याचं जयंत पाटील म्हणाले. नंतर 10 लाखांचे अर्ज लाखावर आणण्याचा यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.