राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे राज्याचा कारभार सुरु राहणे अपेक्षित : आ. बाळासाहेब पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राला समतेचा विचार छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी दिला. त्यामुळे त्यांची सर्वत्र जयंती मोठया उत्साहात साजरी केली जाते. सर्व जातीधर्माला, समाजाला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका त्यांची होती. आदर्श राजे म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्या विचारांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या विचारांप्रमाणे खऱ्या अर्थाने राज्याच्या कारभाराची घौडदौड सुरू राहणे अपेक्षित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या १४९ व्या जयंतीनिमीत्त आज कराड येथे शाहू चौकातील त्यांच्या पुतळ्यास राज्याचे माजी सहकार मंत्री व आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, कराड लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), कराड पंचायत समितीचे माजी सभापती प्रणव ताटे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आज राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त कराड शहरातील शाळांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी यावेळी कराड येथील शाहू चौकातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.