कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
सातारा जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर अनेकदा टीका करत असतात. मात्र, ते कधीकाळी एखाद्या कार्यक्रमाच्या निम्मिताने एकत्रित येतात. एकत्रित आल्यानंतर त्यांच्यात अनेक विषयांवर गप्पा रंगतात. त्याचा प्रत्यय आज आला. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार तथा माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील एकत्रित आले. निम्मित होतं संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे. या सोहळ्यात तिघांच्यात अनेक विषयावर चर्चा झाली.
टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात आज संत श्रेष्ठ माऊलीच्या पालखीचे आगमन झाले. जिल्ह्याच्या आजी-माजी पालकमंत्र्यांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. राज्यात काहीही झाले तरी सातारा जिल्ह्यातील नेत्यांचे आपापसातील संबंध हे कायम ऋणानुबंधाचे असतात. काहीही सुख-दुःखाचे प्रसंग घडले तर ते एकमेकांशी संवाद साधतात. त्याचा प्रत्यय आज पालखी सोहळ्याच्या निम्मिताने आला.
माजी पालकमंत्री पाटलांनी माऊलीकडे मागितले ‘हे’ मागणे
सातारा जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री शंभूराज देसाईंनी माऊलीच्या पालखीचे स्वागत केले. यावेळी माजी पालकमंत्री, आमदार बाळासाहेब पाटील हेही उपस्थित होते. यावेळी आ. पाटील यांनी माऊलीच्या पालखीचे दर्शन घेत असताना आक मागणे मागितले. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस अपेक्षित असतो, परंतु आज अखेर पर्यंत पाऊस नाही. राज्यात पाऊस नसल्यामुळे बिकट परिस्थिती आहे. शेतकरी राजा संकटात आहे. त्यामुळे यापुढे चांगला पाऊस पडूदे व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात सुख शांती येऊदे, अशी मागणी आणि प्रार्थना केली असल्याचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.
नेमकी काय झाली असावी चर्चा
सातारा जिल्ह्यात साताऱ्यातील शिवतीर्थाच्या वादावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या दोघांच्यात शिवतीर्थ परिसरातील जागेवरून तडजोडीची भूमिका घेताना दिसत नाही. काळ भाजप आमदार छत्रपती शिवेंद्रराजेंनीही दोन्ही नेत्यांना सबुरीनं घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, दोन्हीही नेते आपापली मते व भूमिकांवर ठाम आहेत. तसेच राज्यात सध्या शिंद-फडणवीस सरकार व विरोधकांच्यात जे काही सुरु आहे. अशा विषयांवर तर आजि माजी मंत्री अन आमदार आबांमध्ये चर्चा झाली नसावी? हे नवलच.
माऊलीच्या वारीत आमदार मकरंद आबांनी हाती घेतला विना
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. पालखीचे जिल्ह्यात आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मकरंद पाटील यांनी पुष्प अर्पण करुन स्वागत केले. यावेळी त्यांनी वारकऱ्यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत हाती विना घेतला.