कराड प्रतिनिधी । राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास 17 जुलै 2023 पासून सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या बुधवारी पार पडलेल्या कामकाजावेळी माजी सहकार व पणन मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका प्रश्नावरून घेरले. आ. बाळासाहेब पाटील यांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या प्रश्नावर कृषिमंत्री मुंडेंनी आकडेवारी सादर केली.
राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरु असून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्नांवरुन घेरले जात आहे. दरम्यान, काल पार पडलेल्या अधिवेशनात आमदार बाळासाहेब पाटील यांनी एक प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, राज्याच्या बहुतांशी भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडला असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी एक व्हाट्सअप्प नंबरची घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या आठवड्यात केली होती. त्या नंबर वर आतापर्यंत किती शेतकऱ्यांकडून कोणकोणत्या तक्रारी आल्या आहेत?, असा प्रश्न आ. पाटील यांनी उपस्थित केला.
आ. बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आकडेवारी सादर केली. कृषिमंत्री मुंडे म्हणाले की, अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात कृषी आढावावेळी एक व्हॉट्सअप नंबर सुरु केल्याची मी घोषणा केली. शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी सुरु केलेल्या व्हॉट्सअप नंबर वर आतापर्यंत ३ हजारहून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या आहेत.
आ. बाळासाहेब पाटलांनी अधिवेशनात कृषी मंत्र्यांना विचारला ‘तो’ प्रश्न; कृषिमंत्र्यांकडून आकडेवारी सादर pic.twitter.com/pELmJWnbpp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 27, 2023
त्यामध्ये बियाणांच्या संदर्भात ३९२ तक्रारी, खताच्या संदर्भात २१० तक्रारी, खत लिंकींगच्या संदर्भात ३२ तक्रारी, कीटकनाशकाच्या संदर्भात ६१ तक्रारी तसेच इतर २ हजार ७९६ अशा एकूण मिळून ३ हजार ४९१ तक्रारी आतापर्यंत आल्या आहेत. संबंधित शेतकऱ्यांकडून येत असलेल्या तक्रारीची दररोज दखल घेत त्यानं मॉनिटर करून त्या खालील विभागाकडे दिल्या जात आहेत. संबंधित विभागास सांगून तात्काळ त्याची चौकशी करण्याचे निर्देश आपण दिल्या असल्याचे कृषिमंत्री मुंडे यांनी सांगितले.