शाळेतून घरी आल्यानंतर मुलगी बाथरूममध्ये गेली अन् काही वेळानंतर रक्ताच्या थारोळ्यात आढळली; नेमकं काय झालं?

0
19
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शहरामध्ये एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आली. तिला तातडीने खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. संबंधित मुलीच्या घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात शोककळा पसरली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, खंडाळा शहरामध्ये महावितरण कार्यालय परिसरात असणाऱ्या एका इमारतीमध्ये ही अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसोबत भाडेतत्त्वावर राहत होती. संबंधित कुटुंब जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समोर येत आहे. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शाळेतून घरी आल्यानंतर मुलगी घराच्या बाथरूममध्ये गेली.

बऱ्याच वेळानंतरही बाहेर न आल्याने संशय आल्याने कुटुंबियांनी बाथरूमचा दरवाजा तोडून पाहिले असता मुलगी शाळेच्या गणवेशातच रक्ताच्या थारोळ्यात पडली असल्याचे दिसून आले. आईने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे नागरिक जमा झाले व जखमी मुलीला शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती कळताच घटनास्थळी फलटणचे प्रभारी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम, खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक विभाग व ठसेतज्ञांचे पाचारण करण्यात आले. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.