कोयनेच्या पाणी विसर्गाचे आत्तापासूनच नियोजन करा; मंत्री शंभूराज देसाईंच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना

0
480
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कोयना धरणात 65 टक्के पाणी साठा झाला आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होते. पाणी विसर्गामुळे पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरणातील पाणी विसर्गाचे आत्तापासून नियोजन करा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे कोयना धरणातील पाणी पातळी, पडत असलेला पाऊस यांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभय काटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मागील तीन वर्षाचा पडलेल्या पावसाचा अभ्यास करुन व या वर्षीच्या पावसाचा अंदाज काढून कोयना धरणातील विसर्गाचे बारकाईने नियोजन करावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोयना धरणातील पाणी सोडत असताना नदीकाठच्या गावांना आदी सतर्कतेचा इशारा द्या. विसर्गामुळे नदीकाठच्या नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोयना नदीला उपनद्यांचे पाणी मिळत असते त्यामुळे विसर्गाचे बारकाईने नियोजन करा. सर्कल, तलाठी, पोलीस पाटील यांच्या बैठका घ्या. ज्या गावांना पुराच्या पाण्याचा धोका आहे त्या गावांमध्ये काय उपाययोजना करायच्या आहेत याबाबत सूचना द्या, असेही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत सांगितले.