सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावातील वटवृक्षांची सर्वांनाच भुरळ कायम; नेमकं काय आहे ऐतिहासिक महत्व?

0
991
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील अनमोल ठेवा म्हणून म्हसवे (ता. जावळी) येथील महाकाय वटवृक्षांची ख्याती आहे. वटपौर्णिमेनिमित्त येथे महिलांसह अनेक निसर्गप्रेमी व पर्यटक भेट देतात. पाचवड- कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक असलेले वडाचे झाड देशातील सर्वांत जुने आणि विस्ताराने मोठे असे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला ‘वडाचे म्हसवे’ या नावाने ओळखले जाते.

त्‍याची ब्रिटिशकालीन फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणूनही नोंद आहे. येथील वटवृक्षाचा वंश तब्बल साडेपाच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. १९८२ मध्‍ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य कुक थिओडोर हे १९०३ मध्ये कार्यरत होते.

त्यांनी पश्‍चिम घाटातील वनस्पतींचे निरीक्षण करून एक पुस्तकही लिहिले. त्यातही या वृक्षाची नोंद केली आहे. विस्ताराने प्रचंड मोठ्या असलेल्या झाडावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी २८ प्रजातींचे वास्तव्य आढळते.झाडाच्या पारंब्यांचे अनेक खोडात रूपांतर झाले आहे व त्यांची संख्या शंभरीपार आहे. हे झाड सुमारे २०० वर्षांहून अधिक काळ अद्याप टिकून आहे.

पंचक्रोशीतील महिलांची गर्दी

वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. वटवृक्षाची पूजा महिलांनी केल्याने अनेक लाभ मिळतात, असे म्‍हणतात. प्रत्येक वटपौर्णिमेला या ठिकाणच्या वडांच्या झाडांचे पूजन करण्यासाठी पंचक्रोशीतील महिला इथे येतात. असंख्य वड असल्यामुळे महिलांची अजिबात गर्दी होत नाही. आपल्याला आवडणाऱ्या झाडाचं गटागटाने पूजन करतात. या गगनचुंबी वडाच्या झाडाचे आजच्या वटपौर्णिमेच्या दिवशी पूजन करणे आणि या वडांच्या पारंब्यांमधून वाट काढत फिरणे म्हणजे या गावातील सौभाग्यवतींचे भाग्यच.