सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून सातारा जिल्ह्यातील चुरशीच्या लढती होणाऱ्या मतदारसंघांत दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभातून तोफा धडाडणार आहेत. यामध्ये महायुतीकडून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, तर महाविकास आघाडीकडून खासदार शरद पवार, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, अमोल कोल्हे या दिग्गज नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यात आठ विधानसभा मतदार संघात कुठे ‘काटे की टक्कर’ तर कुठे घासून अन् ठासून लढत होणार आहे. विद्यमान आमदारांनी पुन्हा एकदा आखाड्यात दंड थोपटले आहेत. तर त्यांना पराभूत करण्यासाठी बंडखोर अन् अपक्ष उमेदवारांनी तेल लावून तयारी केली आहे. या दरम्यान, उमेदवारांच्या प्रचारार्थ जिल्ह्यात आता महायुती अन् महा विकास आघाडीतील मोठे नेतेमंडळी जिल्ह्यात सभा घेणार आहेत.
‘मविआ’ कडून शरद पवार, प्रियांका गांधी अन् उध्दव ठाकरे
महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी खासदार शरद पवार यांच्या १६ नोव्हेंबरला एकाच दिवशी जिल्ह्यात ४ सभा होणार आहेत. यामध्ये वाई, कोरेगाव, दहिवडी आणि फलटणचा समावेश आहे. पाटण मतदारसंघात मल्हारपेठला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आघाडीचे उमेदवार हर्षद कदम यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही सभांचे नियोजन आहे. कराड दक्षिण मतदारसंघात आघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारासाठी प्रियांका गांधी यांच्या सभेचे नियोजन आहे.
‘महायुती’कडून योगी, फडणवीस अन् गडकरी
महायुतीकडून कराड दक्षिण मतदारसंघात डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची तर कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडेंच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रवीण दरेकर यांच्या सभांचेही नियोजन सुरू आहे. त्यांच्याकडून तारीख अंतिम करण्याचे काम सुरू आहे.
5 विधानसभा मतदारसंघांत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती
विधानसभेच्या निवडणुकीत यावेळेस पाच विधानसभा मतदारसंघांत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढती होत आहेत. यामध्ये कराड उत्तर, कोरेगाव, माण-खटाव, कराड दक्षिण आणि पाटण मतदारसंघाचा समावेश आहे. येथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत आहे.