सातारा प्रतिनिधी | दसऱ्यानंतर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असून शेतकरी संघटनांनी ऊसदराचे आंदोलनाबाबत भूमिका घेतली आहे. याबाबत चर्चेद्वारे मार्ग काढून गळीत हंगाम यशस्वी व्हावे यासाठी स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी प्रयत्नशील आहेत. त्यांनी सोमवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांची संयुक्त बैठक बोलावली असल्याची माहिती रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष वसीम इनामदार यांनी दिली.
इनामदार यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होणार असून साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना उसाच्या दराबाबत योग्य भूमिका घ्यावी, अशी मागणी सर्व शेतकरी संघटनांची आहे. त्या अनुषंगाने कराड उत्तर शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन देण्यात आले होते. त्यांनी या निवेदनाची दखल घेतली असून सोमवारी सर्व साखर कारखान्याचे चेअरमन, कार्यकारी संचालक आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक बोलावली आहे.
जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदारांसह कराड उत्तर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसीम इनामदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, सातारा जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोसले, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे गणपत यादव यांना देखील या बैठकीससाठी निमंत्रित करण्यात आले आहे.