पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सर्वाधिक नोंदी या पाटण तालुक्यात सापडल्या आहेत. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. अशा बांधवांना कुणबी जात प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी मराठा समाजाचे राज्य समन्वयक राजेंद्र निकम यांनी तहसीलदार रमेश पाटील यांच्याकडे केली आहे.
पाटण तालुक्यातील सकल मराठा समाज समन्वयकांनी तहसीलदार रमेश पाटील यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी समन्वयकांनी पाटण तालुक्यातील कुणबी नोंद शोधमोहीम संबंधित चर्चा केली. यावेळी राज्य समन्वयक विवेक कुराडे पाटील, पाटण तालुक्यातील ज्येष्ठ समन्वयक यशवंतराव जगताप, शंकरराव मोहिते, विक्रम यादव व मराठा बांधव उपस्थित होते.
यावेळी तहसीलदार पाटील म्हणाले, मराठी भाषेतील सर्व दस्तऐवज तपासून झाले आहेत. आतापर्यंत ४० हजार कुणबी नोंदी सापडल्या आहेत. तसेच मोडी भाषेतही कार्यालयाकडे खूप दस्तऐवज आहेत. त्याची छाननी करण्याचे काम सुरू आहे.
पाटण तालुक्यातील www. satara.gov.in या वेबसाइट तालुका व गाववार कुणबी नोंदीचे दस्तऐवज अपलोड केले आहेत. त्यामध्ये ज्यांच्या पूर्वजांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आहेत, त्यांनी ज्या व्यक्तीची कुणबी नोंद आहे, त्याच्याशी आपले रक्ताचे नाते असल्याची वंशावळ जुळवून १९६७ पूर्वचा रहिवासी पुरावा व शाळचा दाखला देऊन लवकरात लवकर तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत, असे आवाहन राजेंद्र निकम यांनी केले.