कराड प्रतिनिधी । विविध शासकीय उपक्रमांसह राष्ट्रीय उपक्रमांमध्ये नेहमीच एक पाऊल पुढे असलेल्या पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी येथील घरांच्या छपरांवर आता सौर ऊर्जा निर्मिती होणार आहे. घरांच्या छपरांवर तब्बल शंभर किलोवॕट वीज निर्मिती करणारी मान्याचीवाडी लवकरच सौरग्राम म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करेल. घरोघरी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला असून सौरऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीची लगबग संपूर्ण गावात सुरू झाली आहे.
टाटा सोलर पावर कंपनीच्या सन्मित्र सोलर एनर्जीच्या माध्यमातून सुमारे दहा तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांची हा प्रकल्प उभारणीसाठी लगबग सुरू झाली आहे. मान्याचीवाडीने स्वच्छतेपासून सुरू केलेला प्रवास आता अपारंपारिक ऊर्जा निर्मितीपर्यंत पोहोचला आहे. आतापर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून येथील ग्रामस्थांनी पर्यावरण संवर्धनासह संतुलन राखण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. यामुळेच आतापर्यंत वसुंधरा अभियामध्ये राज्य शासनाच्या वतीने या ग्रामपंचायतीचा दोन वेळा गौरवही करण्यात आला आहे.
राज्यातील पहिले सौरग्राम
अपारंपारिक ऊर्जा निर्मितीसाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर येथील ग्रामस्थांनी बैठक घेऊन ऊर्जा निर्मितीचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील सर्वच वीज ग्राहकांनी ऑनग्रीड सौरऊर्जा निर्मीतीची शासकीय अधिकारी प्रक्रिया पूर्ण केली असून राज्यातील पहिले सौरग्राम करण्याच्या हालचाली मान्याचीवाडी येथे गतीमान झाल्या आहेत.
असा असेल सौरऊर्जा प्रकल्प…
१) गावातील १०० वीजग्राहकांच्या घरांच्या छतावर होणार वीज निर्मिती.
२) ग्रामपंचायत कार्यालय, शाळा, अंगणवाडीसाठी ५ किलो वॕटचा स्वतंत्र प्रकल्प.
३) पाणीपुरवठा योजनेच्या विहीरीवर चार किलो वॕटचा स्वतंत्र प्रकल्प.
४) प्रत्येक घराच्या छतावर एक किलो वॕट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प..
५) प्रत्येक घराच्या छतावर निर्माण होणार सुमारे पंधराशे युनिट (वार्षिक) वीज १५०० निर्मिती.
६) गावकरी करणार लाखो युनिट (वार्षिक) वीज निर्मिती.
७) ऊर्जा उत्सर्जनसह कार्बन न्यूट्रलसाठी होणार मदत.
८) वीज दराच्या वारंवार होणाऱ्या दरवाढीवर ग्रामस्थांनी शोधला कायमस्वरूपी उपाय.
राज्यातील हा पहिलाच प्रकल्प लवकरच पुर्णत्वास जाईल : रवींद्र माने
ग्रामस्थांचे ऐक्य आणि शासनाच्या विविध अभियानांमध्ये असलेले सातत्य यामुळेच गावाचे नाव सातासमुद्रापार गेले आहे. राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान आणि केंद्र शासनाच्या पी.एम.सुर्यघर योजना आणि ग्रामस्थांचे योगदान यामुळेच हा प्रकल्प छोट्याशा गावात यशस्वी होत आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे सचिव प्रवीण दराडे, अभियान संचालक सुधाकर बोबडे आणि महावितरणचे बारामती झोनचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांचे मार्गदर्शनाखाली राज्यातील हा पहिलाच प्रकल्प लवकरच पुर्णत्वास जाईल, अशी प्रतिक्रिया मान्याचीवाडी गावचे सरपंच रवींद्र माने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.