कराड प्रतिनिधी | लक्ष्मीपूजनानिमित्त घरात आणलेले सुमारे 110 तोळे सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना ओगलेवाडी (ता. कराड) परिसरात घडली आहे. एका उद्योजकाचे बंद घर फोडून हा चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. याबाबत प्रतीक वसंत खाडे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी परिसरातील करवडी फाटा येथील खरेदी विक्री संघाच्या पाठीमागे ओढ्यानजीक उद्योजक कै. वसंत खाडे यांचा साई व्हिला बंगला आहे. याच ठिकाणी त्यांचे वर्कशॉप व गारमेंट आहे. वसंत खाडे यांच्या वर्षभरापूर्वी निधन झाले असून, त्यांची पत्नी, मुलगा प्रतीक व सून असे साई व्हिला बंगल्यात वास्तव्यास आहेत. दिवाळी असल्याने 6 नोव्हेंबरपर्यंत वर्कशॉप व गारमेंटमधील सर्व कर्मचार्यांना सुट्टी देण्यात आली आहे. केवळ रात्र व दिवस पाळीसाठी 3 वॉचमन त्यांच्या शिफ्टनुसार कामावर हजर होते. प्रतीक यांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच दिवाळीचा सण असल्याने 2 नोव्हेंबर रोजी पाडव्याच्या दिवशी सकाळी प्रतीक व त्यांच्या पत्नी दोघेजण सांगलीला गेले होते. तर त्याच दिवशी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांची आई हजारमाची येथे माहेरी गेल्या होत्या. जाताना त्यांनी घराला कुलूप लावून घराची किल्ली घरकामासाठी येणार्या व त्यांच्याच बंगल्यासमोरील जुन्या घरात वास्तव्यास असलेल्या महिलेकडे दिली.
दरम्यान, सोमवारी सकाळी वॉचमन बंगल्याच्या परिसरातील लाईट बंद करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना वरच्या मजल्यावरील दरवाजा उघडा दिसले. तसेच घरातील कपाट उचकटून कपाटाचे लॉकर तोडून त्यातील 109.5 तोळे सान्याचे दागिने व दीड लाख रूपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजू तासिलदार यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, बंगल्यासमोर असलेल्या केबिनमध्ये रात्र पाळीचा वॉचमन हजार होता. तर चोरटयांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूस दुसर्या व तिसर्या मजल्याच्या खिडकी व बाल्कनीच्या रेलींगला गुलाबी रंगाच्या गाठी मारलेल्या दोन दोर्या बांधल्याचे आढळून आले आहे. याच दोर्यांवरून चोरटयांनी वर चढून खिडकीचा गज कापून व दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.