कराडच्या कोयना नदीवरील जुन्या पुलाखाली आढळला 35 वर्षीय पुरूषाचा मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड येथील कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलाखाली सुमारे ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह अढळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मृतदेहाच्या गळ्यावर वार केल्यासारख्या खुणा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळे कराड शहर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराडच्या जुन्या कोयना पुलाच्या परिसरातील नदीपात्रात एका पुरूषाचा मृतदेह वाहनधारकांना दिसला. त्यामुळे पुलावर गर्दी झाली.याबाबतची माहिती नागरीकांनी कराड शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील,अर्जुन चोरगे, अमित पवार, शशिकांत काळे,कुलदीप कोळी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह नदीपात्राबाहेर काढत तपास सुरू केला.

मृतदेहाच्या गळ्यावर वार झाल्यासारख्या खुणा दिसत असल्या तरी नेमका निष्कर्ष काढण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू होते. शवविच्छेदनानंतरच नेमकी माहिती हाती लागेल,असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृताची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

घातपात झाला असण्याचा संशय

कराड येथील जुन्या कोयना पुलाखाली आढळून आलेल्या मृतदेहाची रात्री उशीरापर्यंत ओळख पटली नव्हती. दरम्यान, पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनीही घटनास्थळास भेट देत अधिकाऱ्यांना तपासाबाबत सुचना दिल्या. संबंधिताचा घातपात झाला असण्याची प्राथमिक शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.