‘माझी वसुंधरा 4.0’मध्ये मान्याचीवाडी राज्यात प्रथम, एक कोटीचे बक्षीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर केला असून, दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडीने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे गावाला एक कोटीचे बक्षीस मिळाले असून या पुरस्कारामुळे सातारा जिल्ह्याचा डंका पुन्हा वाजला आहे.

पृश्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान राज्यात २०२० पासून राबविण्यास सुरूवात झाली, तर माझी वसुंधरा अभियान ४.० हे राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांत १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ पर्यंत राबविण्यात आले. यात राज्यातील २२ हजार २१८ ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता.

या स्पर्धेचा निकाल लागला आहे. यामध्ये मान्याचीवाडी गावाने दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत एक कोटीचे बक्षीस प्राप्त केले आहे, तर या गटातच दुसरा क्रमांक नाशिक जिल्ह्यातील आवळी दुमाला, तर तिसरा क्रमांक अहमदनगर जिल्ह्यातील तिगाव गावाने प्राप्त केला आहे.

मान्याचीवाडी गाव भविष्यात अनेक पुरस्कार प्राप्त करेल : रवींद्र माने

मान्याचीवाडी गावाने माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या गावाने आतापर्यंत अनेक अभियान, उपक्रमांत यश मिळवून सातारा जिल्ह्याचे नाव राज्य, देशात नेहमीच उंचावले असल्याची प्रतिक्रिया मान्याचीवाडी गावचे सरपंच रवींद्र माने यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.