सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” ही महत्त्वाकांक्षी योजना सुरु करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 2 हजार 131 महिलांचे या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आले आहे. घरोघरी जावून नोंदणी करण्यात येत असल्याने दर दिवशी हा आकडा वाढत आहे. जिल्ह्यात योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली गावपातळीपर्यंत यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेल्या 2 लाख 2 हजार 131 नोंदणीमध्ये 1 लाख 22 हजार 951 अर्ज ऑनलाईन पध्दतीने तर 79 हजार 180 अर्ज ऑफलाईन पध्दतीने नोंदणी झाले आहेत.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक अटी शर्ती – योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ या वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, अविवाहित असावी. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे. (डोमासाईल, डोमासाईल नसल्यास १५ वर्षा पूर्वीचे रेशनकार्ड/मतदान ओळखपत्र/शाळा सोडल्याचा दाखला/जन्माचा दाखला या पैकी कोणताही एक रहिवाशी पुरावा आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला, अविवाहित. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
सदर योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणा-या लाभार्थ्यांचे बैंक खाते आवश्यक असून सदर बँक खात्यास आधार लिंक असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे. तथापी पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे. पात्र कुंटूंबातील फक्त एक अविवाहीत महिला सदर योजनेचा लाभ घेऊ शकते. या योजनेत दि. ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल, तसेच दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक १ जुलै २०२४ पासून दरमहा रु.१५००/- अधिक लाभ देण्यात येणार आहे”.