पाटण प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांचा ‘संवाद मेळावा’ शनिवार दि. ३० मार्च रोजी ऋचा हॉल, काळोली (कराड-चिपळूण रोड) येथे दुपारी १२:३० वा. होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे पाटण तालुका अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
या संवाद मेळाव्यासाठी माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रमुख नेते पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चे माजी मंत्री बाळासाहेब पाटील,माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, शिवसेना उ.बा.ठाकरे पक्षाचे प्रवक्ते नितीन बानगुडे-पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे , राष्ट्रीय कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस हिंदुराव पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवसेना उ.बा.ठाकरे सातारा जिल्हा अध्यक्ष हर्षद कदम या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
आगामी सातारा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा संवाद मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे. पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या मेळाव्यातून उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. पाटण तालुका हा मतदानाच्या दृष्टीने फार मोठा मतदारसंघ असल्याने महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये चांगला समन्वय साधून जास्तीत जास्त मतदान महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पारड्यात पाडण्यासाठी यावेळी रणनीती तयार करण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते, सर्व पदाधिकारी, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, आजी/माजी जि.प.सदस्य, आजी/माजी पं.स.सदस्य, आजी/माजी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, नगरसेवक/नगरसेविका, आजी/माजी सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व सर्व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी या संवाद मेळाव्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अशी पत्रकात केले आहे.