सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. यामध्ये खास करून माढा लोकसभा निवडणुकीसाठी अधिक चुरस पहायला मिळणार आहे. कारण या लोकसभा मतदार संघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासह राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी परभणी किंवा माढ्यातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष जानकर या मतदारसंघातून शड्डू ठोकणार असून त्यासाठी त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोंगडी बैठकांच्या माध्यमातून गावोगाव प्रचार करण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शनिवार दि. १७ रोजी फलटणमध्ये विजय निर्धार सभेचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात जानकर नक्की काय बोलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, जानकर यांच्या उमेदवारीमुळे महायुती व मविआच्या उमेदवारांच्या अडचणी वाढणार आहेत.
मतदारसंघातील फलटण, माण, माढा, करमाळा, माळशिरस व सांगोला या सहा मतदारसंघांमध्ये समन्वयकांची निवड करण्यात आली होती. त्यातील फलटण व माण मतदारसंघाची जबाबदारी पक्षाचे सातारा जिल्हा प्रभारी अजित पाटील यांच्याकडे देण्यात आली होती. त्यांनी व अन्य चार समन्वयकांनी मतदारसंघातील प्रत्येक गावात घोंगडी बैठका घेऊन ग्रामस्थांपर्यंत पक्षाची भूमिका पोचविली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर महादेव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघनिहाय बूथ लेवल कार्यकर्त्यांच्या बैठकाही पार पडल्या आहेत
दरम्यान, महादेव जानकर यांनी गावपातळीवरील बांधणी पूर्ण झाल्याने पक्षाने शनिवारी फलटण येथे माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त शिंगणापूर येथील शंभूमहादेवाचे दर्शन घेऊन जानकर यांच्या नेतृत्वाखाली चारचाकी वाहनांची रॅली काढण्यात येणार आहे. शिंगणापूर-कोथळे- जावली- मिरडे- वडले- सोनवडी- सोनवडी बुद्रुक- कोळकीमार्गे ही रॅली मेळाव्याच्या ठिकाणी पोचणार आहे.