सातारा प्रतिनिधी | भाजप ‘हायकमांड’ने माढा लोकसभेसाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. त्यामुळे दुखावलेले गेलेले धैर्यशील मोहिते-पाटील यांची नाराजी अजुनही दूर झालेली नाही. त्यामुळे त्यांनी मतदारसंघातील गावभेटीवर जोर दिला आहे. तर ‘रासप’चे महादेव जानकर यांनीही संजीवराजे आणि रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांची भेट घेतली. तिघांच्यामध्ये सुमारे दोन तास कमराबंद चर्चा पार पडली. तिघांच्या झालेल्या भेटी व चर्चेमागे राजकीय अर्थ दडल्याने माढ्यात अनपेक्षीतही घडामोडी सुरू असल्याचेही स्पष्ट झालेले आहे. “उमेदवार कोणीही असू द्या एकमेकाला साथ देऊया,” असे या चर्चेत ठरल्याचीही माहिती मिळत आहे.
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे सातारा जिल्ह्यातीच. त्यांना माढ्यातून निवडणूक लढवायची आहे. स्वबळावर निवडणूक लढणार अशी घोषणा त्यांनी फलटणमध्येच केली होती. पण, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर माढ्यासाठी भेट घेतली. त्यातून त्यांना अजूनतरी हिरवा कंदील मिळालेला नाही. अशातच त्यांनी गुरुवारी सकाळीच फलटणला रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे आणि रघुनाथराजे यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नक्कीच होती. यात राजकीयच अऱ्थ दडलेला आहे. तरीही जानकर यांना निवडणूक लढवायची आहे, तसेच संजीवराजेही तयारीत आहेत. अशात तिघांच्याही झालेल्या भेटीची चांगलीच चर्चा माढा लोकसभा मतदार संघात सुरू झाली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून ही चाैथी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. पण, या निवडणुकीने महाविकास आघाडी आणि महायुतीतही वादळ उठवलेले आहे. यात भाजपने खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. पण, याचा आनंद भाजपमध्ये तसेच युतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाही झालेला नाही. कारण, उमेदवारी जाहीर झाल्यापासून फलटणचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी उठाव केला. तर अकलुजचे मोहिते-पाटीलही खुश नाहीत. सध्या माढा लोकसभा मतदार संघात नाराजी नाट्य सुरू आहे.