सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका घरातून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून मुद्देमाल नेल्याची तक्रार लोणंद पोलीसात दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करताना लोणंद पोलीसांनी एका संशयीतास अटक करून त्याच्याकडून चोरीचे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद येथील गोटेमाळ परीसरातील एका घरातून (दि.६) जून रोजी सोन्याच्या दागिण्यांसह रोख रकमेची चोरी झाल्याची घटना घडली होती. सदर घटनेचा तपास करताना लोणंद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून पुरंदर प्रकाश काळे (वय ५०) रा. वेअर हाऊस खंडाळा (ता. खंडाळा, जि. सातारा) या संशयीतास व एका अल्पवयीन बालिकेस ताब्यात घेतले असता त्यांनी लोणंद हद्दीतील गोटेमाळ येथील घरामधील चोरी केलेची कबुली दिली आहे.
चोरीतील चालु बाजार भावाप्रमाणे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिणे आरोपीकडून हस्तगत करण्यात आले आहेत. लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार संजय बनकर, संतोष नाळे, विठ्ठल काळे, सर्जेराव सुळ, केतन लाळगे, यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला असुन पोलीस हवालदार संजय बनकर हे पुढील तपास करीत आहेत.