सातारा प्रतिनिधी । लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जर्शी गाईच्या चोरीचे प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल झाले होते. सदर गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले. तसेच आरोपींकडून एकूण 5 लाख 28 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
कल्याण तानाजी येळे (वय २४, रा. घाडगेवाडी ता. फलटण जि. सातारा) व सचिन साहेबराव येळे (वय ३७, रा. येळेवस्ती, घाडगेवाडी ता. फलटण जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, दि. १४ मार्च रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी हा बीबी ता. फलटण परीसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुशिल भोसले व गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका आरोपीस ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यांचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने व एका साथीदाराने मिळुन लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील घाडगेवाडी ता. फलटण येथील गाई चोरीचे एकुण ३ गुन्हे केल्याची कबुली दिली.
सदर गुन्हयातील कल्याण तानाजी येळे (वय २४ रा. घाडगेवाडी ता. फलटण जि. सातारा) व सचिन साहेबराव येळे (वय ३७ रा. येळेवस्ती, घाडगेवाडी ता. फलटण जि. सातारा) या दोन आरोपीस ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन चोरी केलेल्या दोन गाई एकुण १ लाख ८ हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन रुपये ४ लाख २० हजार किंमतीचे असा एकुण ५ लाख २८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींनी लोणंद पोलीस ठाणे हद्दीत केलेल्या तीन गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधीकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोहवा. संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विठ्ठल काळे, केतन लाळगे तसेच पोहवा. चंद्रकांत काकडे, सिध्देश्वर वाघमोडे यांनी सदर कारवाई मध्ये सहभाग घेतला